महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांची परीक्षा केंद्राला भेट

 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021 आज मुंबईसह अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली. सदर परीक्षेस 2,992 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी 2,970 उमेदवार उपस्थित होते.

या परीक्षेच्या वेळी आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन महाविद्यालय येथे भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे उपस्थित होते. सदर भेटीच्या वेळी आयोगाच्या अध्यक्षांनी सर्व जिल्हा केंद्रावरील परीक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. तसेच कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराचा प्रयत्न होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले.