पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरिकांकरीता व्हॉटस् ॲप - चॅट बॉट प्रणालीचा वापर

 

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरिकांकरीता व्हॉटस् ॲप - चॅट बॉट प्रणालीचा वापर करून नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा सुविधा संबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी नव्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आज आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. शहरवासीयांना आता घरबसल्या वापरता येणा-या या सुविधेकरीता महानगरपालिकेमार्फत ८८८८००६६६६ हा मोबाईल क्रमांक प्रसारित केलेला असून नागरिकांना स्वत:च्या मोबाईलमध्ये तो समाविष्ट करावा लागणार आहे.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, सह शहर अभियंता रामदास तांबे, अशोक भालकर, श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, संजय खाबडे, वायसीएमचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, रविकिरण घोडके, अजय चारठाणकर, सुभाष इंगळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत अद्ययावत तंत्रज्ञानाचा योग्य पध्दतीने उपयोग करून नागरिकांना वेळोवेळी उत्तमोत्तम सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये महानगरपालिकेचे अद्ययावत संकेतस्थळ, स्मार्ट सारथी मोबाईल ॲप आणि सारथी हेल्पलाईन इत्यादींचा समावेश होतो.  आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरिकांकरीता व्हाटस् ॲप - चॅट बॉट प्रणाली सुरु करण्यात आली आहे. याचा वापर करून नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा सुविधा संबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी नव्याने  सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

८८८८००६६६६ हा मोबाईल क्रमांक आपल्या मोबाई समाविष्ट केल्यानंतर व्हाटस् ॲपद्वारे नागरिकांना चॅट बॉट प्रणालीचा वापर करता येणार आहे. समाविष्ठ केलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे व्हाटस् ॲपद्वारे मेनु असे टाईप केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या सोईनुसार भाषा निवडण्याकरीता मराठी अथवा इंग्रजी असे दोन भाषांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.  भाषेचा पर्याय निवडल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक सत्यापित (व्हेरीफाय) करण्यासाठी आपले नांव सदर ठिकाणी नमुद करणे आवश्यक आहे.  आपले नांव सत्यापित झाल्यानंतर आपणास आपली तक्रार नोंदविण्याकरीता सदर पर्याय उपलब्ध होणार आहेत. सद्यस्थितीत महानगरपालिकेमार्फत प्रायोगिक तत्वावर आरोग्य विभागा संदर्भातील सेवा सुविधा या प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या असून लवकरच महानगरपालिकेच्या इतर विविध विभागांच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.

व्हॉटस् ॲप - चॅट बॉटप्रणालीद्वारे नागरिकांना कचरा उचलणारे वाहन आले नाही या बाबतच्या तक्रारी, महानगरपालिका संदर्भातील तक्रारी, सार्वजनिक शौचालया विषयक तक्रारी, मृत जनावरांबाबतच्या तक्रारी, परिसर रस्ता झाडलोड न झाल्याबाबतच्या तक्रारी, सांडपाणी रस्त्यावर वाहत असलेबाबतच्या तक्रारी, बांधकाम राडारोड उचलणेबाबतच्या तक्रारी, सार्वजनिक ठिकाणी कचरा पडून असणे अथवा कचरा जाळण्याबाबतच्या तक्रारी अशा प्रकारच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना आपण केलेल्या तक्रारी बाबतची सद्यस्थिती देखील उपलब्ध होणार आहे.

आभासी सहाय्यक चॅट बॉट या नव्याने विकसित करण्यात आलेल्या प्रणालीमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात आला आहे.   नागरिकांमार्फत विचारण्यात येणा-या प्रश्नांवर संगणक प्रणालीद्वारे कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात येवून प्रश्न आत्मसात करुन त्यानंतर नागरिकांना योग्य ते उत्तर आभासी सहाय्यका चॅट बॉट मार्फत प्राप्त होणार आहे. आभासी सहाय्यक चॅट बॉट प्रणालीद्वारे विविध तक्रारींचे निराकरण नागरिकांना आभासी सहाय्यकाद्वारे चॅट बॉट प्राप्त होणार आहेत. या  प्रणालीद्वारे नागरिकांना दैनंदिन भेडसावणा-या विविध समस्यांचे निराकरण आभासी सहाय्यकाद्वारे चॅट बॉट सहज शक्य होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर चॅट बॉट प्रणाली सुरु करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे.  नागरिक आणि प्रशासन यांच्यामधील संवाद साधण्याचा जलद दुवा म्हणून ही प्रणाली प्रभावी ठरणार आहे.  सहज सुलभ संवादाचे माध्यम महापालिकेने उपलब्ध करुन दिले असून शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त चॅट बॉट प्रणालीचा  वापर करावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image