तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावर छापण्याच्या वैधानिक इशाऱ्याबाबत सुधारित नियामवली येत्या १ डिसेंबरपासून लागू होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व तंबाखू उत्पादनांच्या पॅकिंग अर्थात वेष्टणावरच्या आरोग्यविषयक चेतावणीचा नवीन संच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचित केला असून सुधारित नियमावली चालू वर्षाच्या १ डिसेंबर पासून लागू होईल. त्यानुसार १ डिसेंबर २०२२ रोजी अथवा त्यानंतर उत्पादित अथवा आयात करण्यात आलेल्या अथवा पॅकेज करण्यात आलेल्या सर्व तंबाखू उत्पादनांवर ‘तंबाखूमुळे वेदनादायक मृत्यू होतो’ या आरोग्यविषयक चेतावणीचा मजकूर संबंधित प्रतिमेसह प्रदर्शित करणं बंधनकारक असेल, असं आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. तसंच, पुढील वर्षी १ डिसेंबर नंतर उत्पादित अथवा आयात करण्यात आलेल्या अथवा पॅकेज करण्यात आलेल्या उत्पादनांवर, ‘तंबाखू सेवन करणारे तरुणपणी मरतात’ हा आरोग्य विषयक चेतावणीचा मजकूर प्रतिमेसह प्रदर्शित करणं बंधनकारक असल्याचं यात म्हटलं आहे.

सिगारेटचं उत्पादन, पुरवठा, आयात अथवा वितरणाशी संबंधित कुठल्याही व्यक्तीने तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावर विशिष्ट आरोग्य विषयक चेतावणी असेल, याची खात्री करावी असं यात म्हटलं आहे. या तरतुदींचं उल्लंघन, हा सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांबाबतच्या कायद्या अंतर्गत दंडनीय गुन्हा असल्याचं यात म्हटलं आहे.