वसई दरड दुर्घटनेतल्या मृतांना प्रत्येकी ६ लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आजही कायम आहे. धरणं भरली आहेत, नद्यां इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत, रस्ते पाण्याखाली गेले आहेत, ही परिस्थिती पाहता अनेक पूरग्रस्त ठिकाणी शाळांना आजपासून २-३ दिवस सुटी देण्यात आली आहे. राज्यात आजही विविध ठिकाणी अतिवृष्टिचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्यातल्या वसई दरड दुर्घटनेतल्या मृतांना प्रत्येकी ६ लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून प्रत्येकी ४ लाख रुपये आणि महानगरपालिकेकडील निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये अशी एकूण ६ लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नवी मुंबई अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, विद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अतिवृष्टीची परिस्थिती यापुढेही अशीच राहिल्यास शाळेस सुट्टी घेण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्याची माहिती शिक्षण उपायुक्तांनी दिली.