विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करून राज्यातल्या जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकू - जयंत पाटील


 

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करून राज्यातल्या जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागानं नोटीस पाठवण्याऐवजी निवडणूक आयोगाकडून ही माहिती घेतली असती तर त्यांना तिथून मिळाली असतीच. पण जाणीवपूर्वक यंत्रणांचा गैरवापर करुन प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली.

संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेलेले आहेत. ते निर्दोष असून त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यांच्याविरोधात ईडी जाणीवपूर्वक टोकाची भूमिका घेणार नाही, अशी अपेक्षा करुया, असंही ते म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे. सरकार गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली नाही, पुढच्या काळात एकत्र बसून पुढचं धोरण ठरवू. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत जिथं जिथं शक्य होईल, तिथं तिन्ही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न यशस्वी करु, असं ते म्हणाले.