पेट्रोलच्या दरात पाच आणि डिझेलच्या दरात तीन रुपयांनी कपात करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

 


मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोलवरच्या करात प्रतिलीटर ५ रुपये तर डिझेलवरच्या करात प्रतिलीटर ३ रुपये कपात करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपसुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोजा पडणार आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि केंद्र पुरस्कृत अमृत अभियानाचा दुसरा टप्पा राबविण्याचा तसंच १८ ते ६९ वर्ष वयोगटातल्या नागरिकांना आगामी ७५ दिवस कोविडची वर्धक मात्रा मोफत देण्याची मोहीम राबवण्याचा प्रस्तावही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला.

नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची तसंच राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट निवडणूक घेण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मध्ये  सुधारणा करण्यात येणार आहे. आणीबाणीच्या कालावधीत बंदीवास सोसावा लागलेल्यांना स्वातंत्र्यसैनिकांचं सन्मानवेतन देण्याच्या निर्णयावर २०२० मधे लावलेली स्थगिती हटवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला असून, सुमारे ३ हजार ६०० आंदोलकांना सन्मानवेतन चालू करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना सांगितलं. आणखी ८०० जणांचे अर्ज सखोल तपासल्यावर त्यांनाही सन्मानवेतन लागू होईल असंही ते म्हणाले.