भारतीय वायुसेनेच्या मिग-२१ प्रशिक्षक लढाऊ विमानाचा अपघात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमध्ये बाडमेर जिल्ह्यात भारतीय वायुसेनेच्या मिग-२१ प्रशिक्षक लढाऊ विमानाच्या काल रात्री झालेल्या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. बाडमेर जिल्ह्यातल्या बेटू ब्लॉकमध्ये भीमदा गावाजवळ या विमानाचा अपघात झाल्याचं बारमेरचे जिल्हाधिकारी लोक बंदू यांनी सांगितलं.

वायुदलाच्या या प्रशिक्षण विमानानं उतरलाई इथल्या वायुसेनेच्या तळावरून उड्डाण घेतलं होतं, अशी माहिती भारतीय वायुदलानं आपल्या ट्विटर संदेशात दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्याशी बोलून मिग-२१ विमानाच्या अपघाताची माहिती घेतली. या अपघातात वायुदलाच्या दोन योध्यांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे.