महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गोव्यात सांगितलं. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि इतर अपक्षांची भेट घेतल्यानंतर मुंबईकडे निघण्यापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हे सर्व आमदार उद्या मुंबईत दाखल होतील. ३ आणि ४ जुलैला विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसह बहुमत प्रस्तावावर निर्धारित पद्धतीनुसार कारवाई पार पडेल.

भाजपाकडे १२० आणि आमच्याकडे ५० आमदारांचं पाठबळ आहे. त्यामुळं या १७० आमदारांच्या बळावर बहुमत सिद्ध करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातली सिंचनाखालची जमीन वाढवण्याचा आणि प्रलंबित विकासकामं जलदगतीनं पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यात जलयुक्त शिवार, मेट्रो प्रकल्प यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांच्या फायद्यासाठी काळजीपूर्वक तपासणी करुन मेट्रोचं कारशेड आरेमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आरेमधे मेट्रोचे कारशेड उभारताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, आणि जनतेचं हित साधलं जाईल, याकडे सरकार लक्ष देईल, असं ते म्हणाले.