विविध व्याधी असलेल्या 63 वर्षीय रुग्णावर पुण्यातील लष्कराच्या कार्डीओ-थोरॅसिक सायन्सेस संस्थेतील डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

 

पुणे : पुणे येथील लष्कराच्या कार्डीओ-थोरॅसिक अर्थात हृदयाशी  संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या कार्डीओ-थोरॅसिक सायन्सेस या संस्थेतील डॉक्टरांनी एका 63 वर्षीय  माजी लष्करी अधिकारी असलेल्या रुग्णावर यशस्वीपणे  शस्त्रक्रिया केली. सशस्त्र दलांच्या वैद्यकीय आस्थापनेत प्रथमच करण्यात आलेल्या अशा शस्त्रक्रियेत, इलेक्ट्रो-कॉटरी पद्धतीच्या मदतीने या रुग्णाची कर्करोगाची गाठ काढून टाकण्यात आली. पूर्वीपासून इतर अनेक सह्व्याधी असलेल्या या रुग्णाला फुफ्फुसाचा कर्करोग झाला असून त्याच्या डाव्या बाजूच्या मुख्य श्वसनमार्गाला कर्करोगाने ग्रासून टाकले असल्याचे निदान काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. या संदर्भातील काही महत्त्वाची लक्षणे तसेच खोकल्यातून रक्त पडत असल्याच्या लक्षणांवरून त्याला संपूर्णपणे भूल देऊन पाच डॉक्टरांच्या पथकाने या रुग्णाची तीन तास इतक्या दीर्घ कालावधीची रिजिड ब्राँकोस्कोपी नामक तपासणी आणि इतर प्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या श्वसनमार्गातील अडथळे दूर झाले तसेच त्याच्या डाव्या फुफ्फुसाचे प्रसरण करण्यात डॉक्टरांना यश आले.