राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून उमेदवार जाहीर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी काल आपापले उमेदवार जाहीर केले. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं राष्ट्रपतीपदासाठी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा काल केली; तर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. नवी दिल्लीमध्ये काल झालेल्या भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी २० नावांवर चर्चा झाली; आणि देशाच्या पूर्वेकडील राज्यांमधील आदिवासी आणि महिला नेत्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं नड्डा म्हणाले. पहिल्यांदाच एका महिला आदिवासी उमेदवाराला प्राधान्य देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपतीपदाच्या संयुक्त उमेदवाराचं नाव निश्चित करण्यासाठी काल विरोधी पक्षांनीही नवी दिल्लीत बैठक घेतली. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सिन्हा यांच्या उमेदवारीचा निर्णय एकमतानं घेतल्याचं या पक्षांनी संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर एकमत होण्यासाठी सरकारनं कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी संयुक्त निवेदन वाचल्यावर केला. येत्या २७ तारखेला सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.