अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांनी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य तो तोडगा काढण्यासाठी लवकरच महिला व बालविकास विभागाच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ असे सांगितले.

श्री. एम. ए. पाटील, कमलताई परुळेकर, चेतना सुर्वे, अपर्णा पानसरे आदी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या संघटनेने डॉ. गोऱ्हे यांना अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन दिले.

डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विषयाबाबत योग्य ती माहिती संबंधित विभागाकडून घेण्यात येईल. याकरिता आवश्यकता भासल्यास महिला व बालविकास विभागाचे सचिव स्तरावरील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक घेण्याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले.