महाविकास आघाडी सरकारमधे तक्रारी किंवा गैरसमज असू शकतील, तरी पाठिंबा कायम राहील- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस

 


मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक आज सकाळी मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर पक्षाचे वरीष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यातील राजकीय घडामोडींना हाताळण्यासाठी शिवसेना जे प्रयत्न करेल, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल, असं पाटील यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. भाजपा आमदारांची बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवास स्थानी होत आहे.दरम्यान, शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदी भरत गोगावले यांच्या नियुक्ती केल्याचं पत्र एकनाथ शिंदे यांनी सादर केलं होतं, त्यावरच्या काही आमदारांच्या  सह्यांबाबत प्रशनचिन्ह उपस्थित झालं असून, त्या सर्वांची शहानिशा केली जाईल, असं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं.