देहू आणि आळंदी पालखी सोहळ्यादरम्यान पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या - उपमुख्यमंत्री

 


मुंबई (वृत्तसंस्था) : पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या. कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी किंवा वर्धक मात्र न घेतलेल्यांना ती मात्रा घेण्याचं आवाहन करावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुण्यात काल झालेल्या देहू आणि आळंदी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत आषाढी वारीबाबत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. या ॲपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा आणि मुक्कामचं ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्वाची माहिती पुरवण्यात येणार आहे. पालखी मार्गावर महिलांसाठी ५ किमी अंतरावर शौचालय सुविधा उपल्बध केली जाईल. आषाढी वारीसाठी ३७ विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत आणि ७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरते वैद्यकीय पथक आणि १०८ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहे.अन्न आणि औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचे नियेाजन आहे. पालखी मार्गावर प्रस्थानाच्या वेळी ठरावीक मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे नियोजन केलं आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.साताऱ्यात पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा व दुरुस्ती करण्यात येत आहे. नीरा नदीवरील पुलाची दुरुस्ती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सोलापूरात पालखी आणि रिंगण सोहळ्याच्या नियोजनासाठी २१ आपत्ती व्यवस्थापन केंद्र तयार करण्यात आले आहेत. एकूण १ हजार अधिकारी आणि २५ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. यशदामार्फत अधिकाऱ्यांना, मंदिर व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पंढरपूर शहरात पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे, यापैकी कायमस्वरूपी २४ हजार आहेत. एकूण ४९ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.