शिवसेनेचे बंडखोर आमदार बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या आदेशानंतर बहुमत चाचणीसाठी उद्या विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्याची तयारी विधीमंडळानं सुरू केली आहे. सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या या अधिवेशनासाठी सर्व आमदारांना सूचित करण्यात आल्याचं विधीमंडळ सचिवालयानं कळवलं आहे. या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी समर्थक आमदारांसोबत मुंबईत परत येणार असल्याचं शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

शिंदे आणि इतर आमदारांनी आज सकाळी गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गुवाहाटीहून मुंबई येण्यापूर्वी हे सर्व आमदार गोव्याला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं गोव्यात सर्व चेकनाक्यावर बंदोबस्त वाढवण्यात आला असून वाहनांची काटेकोर तपासणी सुरू झाली आहे. याशिवाय हे आमदार राहण्याची शक्यता असलेल्या हॉटेलच्या परिसरात इतरांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.