फुगेवाडी मेट्रो स्थानकावर साजरा होणार यंदाचा योगदिन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी आंतराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त भारत सरकार देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करत आहे. देशातील विशेष व ऐतिहासिक अशा 75 स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मंत्रालयाला एक स्थान देण्यात आले आहे. पुण्यामध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये योग उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर या योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, महाराष्ट्रचे संचालक पी. एम. पारलेवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय; राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, आयुष मंत्रालय, पुणे; केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, पुणे व पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी पुण्यामध्ये हा योग दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत देण्यात अली.    

फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर सकाळी 6.30 ला या योगोत्सवाचे व माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे तर्फे आयोजित तीन दिवसीय योग व योगगुरुंबद्दल माहिती देणारे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर 6.40 ते 7.00 वाजेपर्यंत म्हैसूर, कर्नाटक येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थित नागरिकांसाठी होईल. त्यानंतर 7.00 ते 7.45 या वेळात सामान्य योग सत्र म्हणजेच नियमित सोपे योग सत्र घेण्यात येईल. या कार्यक्रमासाठी एक हजाराहून अधिक नागरिक उपस्थित राहू शकतील असे नियोजन करण्यात आले असल्याचे पारलेवार यांनी यावेळी सांगितले.

पुण्यातील नागरिकांसाठी ऐतिहासिक नव्हे तर आधुनिक व सार्वजनिक अशा ठिकाणी योग दिन आयोजित करत आहोत, ज्याच्याशी नागरिकांचा नव्याने परिचय होत आहे, याबद्दल आनंद असल्याची भावना डॉ. सत्यलक्ष्मी यांनी व्यक्त केली. वाहनतळ, प्रवेश व तिकीट मजला तसेच प्रत्यक्ष मेट्रो प्लाटफॉर्म अशा तीन मजल्यांवर 21 जून रोजी फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर सहभागी नागरिकांसह योग सराव/प्रात्यक्षिक होणार आहे. या सर्व नागरिकांसाठी योगा मॅट, सात्विक अल्पोपहार याची व्यावस्था राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे करण्यात अली आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. के सत्यलक्ष्मी यांनी दिली.

प्राचीन योग आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग असलेल्या मेट्रो सोबत होणार आहे, हि एक विशेष बाब आहे, या उत्सवात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे आणि मेट्रोचे काम देखील पाहावे, असे आवाहन पुणे मेट्रोचे अधिकारी मनोजकुमार डॅनियल यांनी यावेळी केले. प्रथम येणाऱ्या एक हजार नागरिकांना फुगेवाडी ते पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि परत असा मोफत प्रवास दिला जाईल. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने हा मोफत प्रवास प्रायोजित केला आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, पुणे यांच्या तर्फे आयोजित तीन दिवसीय योग चित्र प्रदर्शनाचा लाभ देखील पुण्यातील नागरिकांनी घ्यावा; हे प्रदर्शन मोफत असून प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याची देखील आवश्यकता नसल्याचे ब्युरोचे उपसंचालक निखील देशमुख यांनी स्पष्ट केले. याशिवाय सह्याद्री हॉस्पिटल एक वैद्यकीय शिबिर उभारून आपला सहभाग देणार आहेत. या माध्यामातून प्रथमोपचार व कार्यक्रमातील सर्व सहभागींसाठी मोफत आरोग्य शिबिर उपलब्ध असेल. 

पंतप्रधानांचे भाषण आणि सामान्य योगाभ्यास देखील शहरातील विविध ठिकाणी एलईडी प्रोजेक्टरद्वारे थेट स्क्रीनिंग केले जाईल. IDY कार्यक्रमाचे तपशील होर्डिंग्ज, बॅनर, सोशल मीडिया पोस्ट, फ्लॅश मॉब आणि विविध कार्यालये, नामवंत व्यक्ती आणि पुणे जिल्ह्यातील रहिवाशांना आमंत्रण देऊन प्रसारित आणि प्रसिद्ध केले जात आहेत. योग दिनाच्या प्रचार आणि प्रचारासाठी, रेड एफएम 93.5 वर रेडिओ जिंगलद्वारे कार्यक्रमाची रूपरेषा सर्व लोकांसाठी प्रसारित केली जात आहे.