बंडखोर मंत्र्यांकडची खाती इतर मंत्र्यांकडे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळात काही बदल केले आहेत. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसंच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी  होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपवण्याचा  निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडचं नगर विकास, सार्वजनिक बांधकाम खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषी आणि माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च आणि तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

शंभूराज देसाई यांच्याकडची खाती संजय बनसोडे, विश्वजित कदम, सतेज पाटील यांच्याकडे, तर राजेंद्र यड्रावकर यांच्याकडची खाती विश्वजित कदम, प्राजक्त तनपुरे, सतेज पाटील, आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. अब्दुल सत्तार, यांच्याकडील खाती प्राजक्त तनपुरे, सतेज पाटील, आदिती तटकरे यांच्याकडे आहेत. बच्चू कडू यांच्याकडील खाती आदिती तटकरे, सतेज पाटील, संजय बनसोडे, दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहेत.