येत्या दीड वर्षात १० लाख कर्मचाऱ्यांची भरती पूर्ण करण्याचे प्रधानमंत्र्यांचे आदेश

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व शासकीय विभाग आणि मंत्रालयांमधील उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेतला आहे. येत्या दीड वर्षात सरकारतर्फे सुमारे १० लाख नियुक्त्या युद्धपातळीवर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या नियुक्त्यांमुळे सरकारची ताकद वाढून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होण्यास मोठं बळ मिळेल असं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांत प्रधानमंत्री मोदी यांनी सरकारला अधिक लोकाभिमुख आणि जबाबदार बनवलं असून दिलेली आश्वासने शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण करण्याचा पायंडाच घालून दिला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यामुळे सरकारी सेवा देणाऱ्या विभागाचं मनुष्यबळ वाढल्यामुळे  प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल , असं ते म्हणाले. नागरिकांच्या कल्याणासाठी सुशासन देणे हे मोदी सरकारच वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.