बंडखोर शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून केली, तर त्याचा विचार होऊ शकतो- संजय राऊत

 


मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेमधे फूट पडल्यामुळे राज्यातल्या राजकीय पटलावरच्या घडामोडींमधे अधिकाधिक अनिश्चितता निर्माण होत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याला ३७ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा आज समाजमाध्यमावर केला. गुवाहाटी इथल्या हॉटेलमधून त्यांनी या आमदारांसोबतची छायाचित्र प्रसृत केली. त्यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेनं हा दावा फेटाळला. बंडखोरांची जर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल तर त्या सर्वांनी येत्या २४ तासांत मुंबईत येऊन अधिकृतपणे आपली भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडावी, त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे दोन आमदारही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते, आणि त्यांनी यावेळी अनुभव कथन केलं. राऊत यांच्या विधानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारची विधाने करण्यापूर्वी महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांशी चर्चा करायला हवी होती. कोणत्याही पक्षाला सरकारमध्ये रहायचे की नाही हे महाविकास आघाडीचे नेते ठरवू शकतात. परंतु त्यांनी याबाबत कळवायला हवे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. मात्र या दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि आघाडीतच राहील याचा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. सध्याच्या राजकीय पेचप्रसंगामागे भाजपा आहे, आणि ते महाराष्ट्राचं नुकसान करत आहेत असा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या सरकारकडे पुरेसं संख्याबळ आहे, जर आमचं सरकार अल्पमतात आलं असेल, तर भाजपानं अविश्वास प्रस्ताव आणावा असं आव्हानही त्यांनी भाजपाला दिलं.