राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जवानांना आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. केद्रीय राखीव पोलीस दलाचे कुलदीप कुमार, के पुर्णानंद आणि विकास कुमार यांना जम्मू काश्मिर इथं दहशतवाद्याबरोबर लढताना वीर मरण प्राप्त झालं. त्यांना मरणोत्तर शौर्य चक्र देण्यात आलं. या दोन्ही जवानांच्या वीरपत्नींनी हा बहुमान स्विकारला. हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आलं. त्यांच्या वीरपत्नी गीतांजली सिंग यांनी प्रशस्तीपत्र आणि पदक स्वीकारलं. ओडीशा पोलिसांचे कमांडो देवाशीष कुमार सेठी यांना ओडीशातल्या कालाहांडी जिल्ह्यात माओवाद्यांबरोबर लढताना वीर मरण आलं. त्यांनाही शौर्य चक्र देण्यात आलं. त्यांचे बाबा सनातन सेठी आणि आई छाई सेठी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसंच काश्मिर खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढताना जम्मू काश्मिर पोलिसांचे विशेष पोलीस अधिकारी शाहबाज अहमद यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र देण्यात आलं. त्यांचे बाबा अब्दूल अजिज यांनी हा पुरस्कार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांना निवृत्ती पश्चात परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि इतर केंद्रीयमंत्री उपस्थित होते.