जागतिक गोंधळाच्या काळात भारत जगाची नवी आशा - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक गोंधळाच्या काळात भारत आज जगाची नवी आशा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वडोदरा इथल्या स्वामीनारायण मंदिरांनी आयोजित केलेल्या युवा शिबिरांना संबोधित करताना बोलत होते. आज आपण नवीन भारताच्या उभारणीसाठी प्रयत्न करण्याचा सामूहिक संकल्प घेत आहोत. जागतिक अशांतता आणि संघर्षांमध्ये शांततेसाठी जग भारताकडे नव्या आशेनं पाहत आहे. नवा भारत हा नवीन ओळख असलेला आणि प्राचीन परंपरांसह पुढे जाणारा आहे. अशा नव्या भारताने संपूर्ण मानवजातीला दिशा दिली पाहिजे, असंही ते म्हणाले. आम्ही संपूर्ण मानवजातीला योगाचा मार्ग आणि आयुर्वेदाची शक्ती दाखवत आहोत. आम्ही सॉफ्टवेअर ते अंतराळापर्यंत नवीन भविष्याची वाट पाहणारे राष्ट्र म्हणून उदयाला येत आहोत असं त्यांनी सांगितलं.

कोरोना संकटाच्या काळात लस आणि औषधं पुरवठा जगाला करण्यापासून, ते विखुरलेल्या पुरवठा साखळ्यांमध्ये आम्ही स्वावलंबी भारताची आशा निर्माण केली आहे. या संस्कार अभ्युदय शिबिराचं आयोजन केल्याबद्दल स्वामीनारायण मंदिरं आणि त्यांच्या संतांचं कौतुक करताना प्रधानमंत्री म्हणाले की, यामुळे आपल्या संस्कृतीचा आणि राष्ट्राचा अभ्युदय होईल. शिबिराचं उद्दिष्ट आणि प्रभाव संतांच्या सान्निध्यात उजळून निघेल. एक भारत श्रेष्ठ भारत, आत्मनिर्भर भारत आणि स्वच्छ भारत यांसारख्या उपक्रमांद्वारे अधिकाधिक तरुणांना समाजसेवेत आणि राष्ट्र उभारणीत सहभागी करून घेण्याचं या शिबिराचं उद्दिष्ट आहे. त्या बद्दल प्रधानमंत्र्यांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी गुजरात सरकारच्या मंत्री मनीषाबेन वकील प्रदेश भाजपा अध्यक्ष सी.आर.पाटील, स्वामीनारायण मंदिराचे ज्ञानजीवनदास स्वामी, आदी मान्यवर उपस्थित होते.