पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील १९ बालकांना किटचे वाटप

 


मुंबई : ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मदत केली जाते. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थितीत केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरूगन यांच्या हस्ते या योजनेअंतर्गत दिलेल्या लाभाचे सर्व कागदपत्रांचे किट या मुलांना वितरित करण्यात आले.

मुंबई शहर जिल्ह्यातील कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत दिलेल्या लाभाचे कागदपत्र वितरित करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार  मनिषा कायंदे तसेच दोन्ही पालक गमावलेली बालके उपस्थित होते.

वलखमा फातमा आमिर आलम मिर्झा या बालिकेने जानेवारी २०२२ मध्ये १८ वर्ष पूर्ण केली असून या बालिकेसह मुंबई शहर जिल्ह्यातील १८ अनाथ बालके अशी एकूण १९ बालके जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी झाली.

या किटमध्ये पी एम केअर फॉर चिल्ड्रेन या योजनेबाबत थोडक्यात माहिती, या योजनेचे पासबुक, जनआरोग्य कार्ड, प्रधानमंत्री यांचे या मुलांना पत्र तसेच बालकाचे पीएम केअर प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरूगन म्हणाले, मुलांची सर्वसमावेशक काळजी आणि संरक्षण यासाठी शाश्वत पद्धतीने राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे,  शिक्षण आणि शिष्यवृत्तीद्वारे त्यांना सक्षम बनवणे, वयाची 23 वर्षे पूर्ण झाल्यावर 10 लाख रुपये आर्थिक सहाय्य पुरवून  स्वयंपूर्ण अस्तित्वासाठी सुसज्ज बनवणे आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे निरामय आरोग्य सुनिश्चित करणे यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन ही योजना आहे,असेही राज्यमंत्री  एल. मुरूगन यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर यांनी यावेळी प्रत्येक बालकांशी संवाद साधला.

या कार्यक्रमास बाल कल्याण समितीचे अध्यक्ष मिलिंद बिडवई, बाल न्याय मंडळाच्या सदस्या  उर्मिला जाधव, सविता रंधे, युनिसेफच्या अल्फा व्होरा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई शहर, शोभा शेलार व प्र. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सविता ठोसर उपस्थित होते.