प्रधानमंत्री उद्यापासून जर्मनी, डेनमार्क आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून जर्मनी, डेनमार्क, फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या वर्षातला त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. तीन दिवसांच्या या दौऱ्यात, सर्वप्रथम जर्मनीमध्ये बर्लिन इथं जर्मनीचे प्रधानमंत्री ओलाफ स्कोल्ज यांच्याशी त्यांची द्विपक्षीय चर्चा होणार आहे. भारत-जर्मनी आंतरशासकिय चर्चेच्या सहाव्या आवृत्तीचं सहध्यक्ष पद दोन्ही नेते भूषवणार आहेत. ही द्वैवार्षिक चर्चा हा दोन्ही बाजूच्या अनेक मंत्र्यांचा सहभाग असलेला वैशिष्टपूर्ण संवाद मंच आहे.या दौऱ्यात एका उद्योग विषयक कार्यक्रमालाही मोदी आणि स्कोल्ज संबोधित करणार आहेत. जर्मन इथल्या भारतीय समुदायांशी मोदी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते डेनमार्कला रवाना होतील. डेनमार्कचे प्रधानमंत्री मेत्ते फ्रेड्रिक्सन यांच्या आमंत्रणावरुन ते डेनमार्कला जात असून, तिथं डेनमार्कनं आयोजित केलेल्या दुसऱ्या भारत-नॉर्डीक परिषदेत सहभागी होणार आहेत. फ्रेड्रिक्सन यांच्याशी तसंच डेनमार्कच्या राणी मार्गारेट दुसऱ्या, यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. भारत-डेनमार्क व्यापार मंचाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. तसंच तिथल्या भारतीयांना संबोधित करणार आहेत.दौऱ्याच्या शेवटच्या सत्रात प्रधानमंत्री पॅरिसला जाणार असून फ्रान्सचे अध्यक्ष एम्युनिअल मॅक्रोन यांची भेट घेणार आहेत.