कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना तात्काळ सानुग्रह अनुदान मिळवून द्यावं- डॉ. नीलम गोऱ्हे

 


मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांच्या तक्रारीचा पाठपुरावा करुन त्यांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यासाठी विशेष समिती स्थापन करून स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागातून त्यांच्या तक्रारींचा नियमित आढावा घेण्यात यावा असंही त्या म्हणाल्या. सातारा इथं शासकीय विश्राम गृहात विधवा महिलांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. शेतकरी विधवा महिलांना तीन एकरापर्यंत मोफत बी-बियाणे आणि खतं मिळणार असून महामंडळाच्या मार्फत अशा महिलांना कर्ज सुविधा उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन गोऱ्हे यांनी केलं आहे.