कार्ती चिदंबरम यांना सीबीआयकडून चौकशीसाठी समन्स

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीयमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना सीबीआयनं नवी दिल्ली इथल्या सीबीआयच्या मुख्यालयात चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. नियमांचं उल्लंघन करत चीनी नागरिकांना व्हीसा मिळवून देण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कार्ती यांचा सनदी लेखापाल एस भास्करन सध्या सीबीआय़च्या कोठडीत आहेत. त्यांच्या समोर कार्ती यांना आणलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणात सीबीआयनं ६५ हजार ई-मेलची पडताळणी केली आहे. या ईमेलचा पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे. पंजाबमधल्या मनसा इथंल्या एका खाजगी कंपनीनं १ हजार ९८० मेगा वॅटचा एक ऊर्जा  प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी चीनी कर्मचाऱ्यांची मदत घेतली होती. या कर्मचाऱ्यांची व्हीजा प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी या खाजगी कंपनीनं ५० लाख रुपयांची लाच दिली असल्याचा दावा या आरोप पत्रात करण्यात आला आहे. या ऊर्जा प्रकल्पाच्या निर्मीतीला बराच उशीर झाला होता. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा म्हणून या कामगारांना बोलावण्यात आलं होतं. मात्र कामगारांची संख्या केंद्रीय गृह मंत्रालयानं आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचंही या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.