येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करणार - शरद पवार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करणार असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची घोषणा आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली आहे. ते आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात  बोलत होते. सर्वसामान्य कुटुंबांमधल्या विद्यार्थ्यांना कर्मवीर आण्णांनी ज्ञानार्जनाची संधी दिली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आण्णांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे, असं पवार म्हणाले.यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विश्‍वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला शरद पवार आणि ईतर मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन केलं. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांना इस्माईलसाहेब मुल्ला पुरस्कार, बीजमाता राहीबाई पोपेरे यांना रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार, तर माजी मंत्री गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर कर्मवीर पुरस्कार त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख आणि कुटुंबियांना शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला.