स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन

 

मुंबई : “स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांसारखा प्रकांड पंडित, महान योद्धा जगाच्या इतिहासात दुसरा नाही”, अशा शब्दांत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण करून जयंतीनिमित्त त्यांना वंदन केले आहे. तसेच राज्यातील नागरिकांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, “छत्रपती संभाजी महाराजांसारखा प्रकांड पंडित, महान योद्धा जगाच्या इतिहासात दुसरा नाही. महाराजांनी एका हातात लेखणी आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन इतिहास घडवला. स्वराज्यावरचं प्रत्येक संकट यशस्वीपणे परतवून लावलं. हाती घेतलेल्या सगळ्या मोहिमा यशस्वी केल्या. छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्यानं लढायला, स्वाभिमानानं जगायला, स्वराज्यासाठी बलिदान. करायला शिकवलं. राजकारण, समाजकारण, अर्थकारणात पारंगत असलेलं, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेलं, व्यासंगी व्यक्तिमत्व, महान राजे म्हणून छत्रपती संभाजी महाराज कायम आपल्या हृदयात आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.” अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण करुन त्यांना वंदन केले आहे.