युक्रेन संघर्षामुळे अन्न आणि ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या आव्हानांकडे भारतानं लक्ष वेधलं - टी एस त्रिमुर्ती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन संघर्षामुळे अन्न आणि ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या आव्हानांकडे भारतानं लक्ष वेधलं आहे. या युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थैर्याचे व्यापक परिणाम त्या भागात तसंच जगभरात होत असल्याचं संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थाय़ी प्रतिनिधी टी एस त्रिमुर्ती यांनी सुरक्षा बैठकीत सांगितलं.

तेलाचे दर गगनाला भिडले असून, अन्नधान्य आणि खतांची टंचाई दक्षिणेकडच्या, तसंच विकसनशील देशांना भेडसावत आहेत. यामुळे निर्माण झालेल्या अन्न सुरक्षेच्या आव्हानांना आपल्यावरची सर्व दर्पणं झुगारुन प्रतिसाद देण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. ऊर्जा सुरक्षेचा प्रश्नही तितकाच गंभीर असून, सर्वांच्या सहकार्यानं, एकत्रित प्रयत्नातून त्याचं निराकरण करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

बुचामधे झालेल्या सामान्य नागरिकांच्या हत्येचा भारतानं तीव्र निषेध केला असून, याप्रकरणी स्वतंत्रपणे तपास करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. भारत नेहमीच शांततेच्या बाजूनं राहिला आहे, या संघर्षात कोणत्याही बाजूचा विजय होणार नसून राजनैतिक मार्गानंच जीवितहानी थांबेल, असा भारताचा विश्वास असल्याचं त्रिमुर्ती यांनी सांगितलं.