प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला आज ८ वर्ष पूर्ण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला आज ८ वर्ष पूर्ण होत आहेत. तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी दुसऱ्यांदा मोदी यांनी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली. या आठ वर्षात नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. जीवनमान सुलभतेवर सरकारनं विशेष लक्ष केंद्रित केलं असून सरकारच्या विविध योजनांमुळे नागरिकांचं जीवन सुकर होत आहे. 

वाढत्या आकांक्षा आणि जीवनमान सुलभता यांचा मेळ घालत आज नवभारताची व्याख्या लिहिली जात आहे. अद्ययावत पायाभूत सुविधांद्वारे जगणं सुखकर होत आहे. २००२ ते २०१४ या काळात मेट्रोचं काम वर्षाला २० किलोमीटर होतं, तेच २०१४ ते २०२० या कालावधीत वर्षाला ६३ किलोमीटरवर पोहोचलं आहे. डिजिटल पेमेंट मुळे जीवन सुकर होत असून भीमसारख्या ऍपमुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठा लाभ झाला आहे. अमृत योजनेअंतर्गत ११८ लाख कुटुंबांना नळाची जोडणी मिळाली आहे. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनारोग्य योजना यासारख्या योजनाअंतर्गत ३ कोटी २६ लाख नागरिकांवर मोफत उपचार शक्य झाले. ८ हजार ७०० जनौषधी केंद्रांमधून परवडणाऱ्या दरात औषधं मिळणं शक्य झालं असून नागरिकांची ५० ते ९० टक्के बचत होत आहे. पहल योजनेमुळे एलपीजी जोडणीतील दलालीला पायबंद बसला. या योजनेचे २९ कोटींहून अधिक लाभार्थी असून ७० हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची बचत होत आहे. 

सरकारी योजनांचा लाभ आपल्याला मिळेल, असा विश्वास आज देशातल्या गरिबातल्या गरीब व्यक्तीमध्ये निर्माण झाला आहे, हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सरकार संपूर्ण सक्षमीकरणाचं अभियान चालवत असल्याचं  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी ट्विटर संदेशांमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. गेल्या ८ वर्षात भारतानं जी उंची गाठली आहे, त्याचा विचारही पूर्वी कोणी करू शकत नव्हतं, आज जागतिक मंचावर भारताचं सामर्थ्य वाढत असून त्याचे अग्रणी युवा असल्याचा आनंद प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या ८ वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वप्न आणि आकांक्षाचे पंख देऊन नवा आत्मविश्वास जागवला असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.