देशातल्या महिला आमदार, खासदारांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचं केरळात राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिलांनी देशातल्या राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. देशातल्या महिला खासदार आणि आमदाराच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. अशा प्रकारची ही पहिलीच राष्ट्रीय परिषद आजादी का अमृतमहोत्सव सोहळ्याचा भाग म्हणून केरळ विधानसभेने तिरुवअनंतपुरम इथं आयोजित  केली आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत संविधान, स्वातंत्र्यलढा, कायदा, लोकप्रतिनिधित्व अशा विविध परिप्रेक्ष्यातून महिलांच्या भूमिकेबाबत चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यानं इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. राष्ट्रपती उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा प्रारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मंदिराच्या १२५ वर्षांच्या कालावधीचा आढावा घेणाऱ्या लक्ष्मीदत्त या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय निवृत्त लेफ्टनंट  जनरल आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु माधुरी कानिटकर, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रकुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील, आणि आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ञ प्राजक्ता काळे यांना मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.