रशियाद्वारे फिनलंडच्या वीज पुरवठ्यानंतर आता वायू पुरवठ्यावरही बंदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाश्चात्य राष्ट्रं आणि रशिया यांच्यातील वादात आणखी भर पडली असून आणखी रशियानं आपला शेजारी असलेल्या फिनलंडला केला जाणारा नैसर्गिक वायूचाही पुरवठा थांबवला आहे.  फिनिश गॅस कंपनीनं देयकांची रक्कम रुबल्समध्ये न दिल्यानं हा वायू पुरवठा पूर्णपणे थांबवला असल्याचं गॅझप्रॉम या रशियाच्या सर्वात मोठ्या गॅस कंपनीनं म्हटलं आहे. 

रशियाकडून गॅसुम या फिनिश सरकारच्या मालकीच्या  कंपनीला एका करारानुसार वायू पुरवठा करण्यात येत होता, तो करार  रशियानं काल सकाळपासून बंद केला असल्याचं गॅसुमनं म्हटलं आहे. 

रशियानं युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्र्वभूमीवर युरोपीय देशांनी रशियावर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे रशियानं गॅस पुरवठ्याचा मोबदला रुबल्समध्ये देण्यास सांगितलं होतं. पण फिनलंडनं तसं करण्यास नकार दिल्यानं रशियानं वायू पुरवठा थांबवला आहे. 

याशिवाय फिनलंड आणि स्वीडननं नुकतंच नाटोमध्ये सामील होण्यासाठीचं अधिकृत पत्र सादर केलं आहे, ही बाबही रशियाच्या या निर्णयास कारणीभूत आहे.