माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी - विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 

पुणे : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामे, राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आयोजित 'दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची' या प्रदर्शनाला गावागावातील नागरिक आणि विशेष करून महिलांनी आवर्जून भेट द्यावी,असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाला भेट देऊन सर्व चित्रमय फलकांवरील माहिती जाणून घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी देशमुख, माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते उपस्थित होते.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, कोरोना काळात शासनाने महत्वाचे निर्णय घेतले. डॉक्टर मंडळींचा टास्क फोर्स तयार करून वैद्यकीय सेवा जलदगतीने देण्याचा प्रयत्न केला. कोरोना नियंत्रणासोबतच इतरही विकासकामे केलीत, तसेच नवनवीन योजना सुरू केल्या. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयच्या या प्रदर्शनात सर्व योजनांची माहिती मिळते.  सचित्र माहिती असल्याने ती सर्वसामान्यांना अतिशय उपयुक्त अशी आहे. त्यामुळे गावागावातील नागरिक, महिला,युवक यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रदर्शनाला महिलांनी स्वतः भेट देत माहिती घ्यावी व इतर महिलांनाही समाज माध्यमातून आवाहन करावे, सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन सरकारने केलेल्या कामांची माहिती घ्यावी.  योजनांचा लाभ घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल,असे त्यांनी सांगितले. यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला रमजान ईद आणि अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छाही दिल्या. श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी ३६० अंश सेल्फी घेतली.