प्रख्यात संतूरवादक आणि संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रख्यात संतूरवादक आणि संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचं आज सकाळी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. पदमश्री, पदमभूषण आणि संगीत नाटक अकादमीसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. जम्मू इथं १३ जानेवारी १९३८ ला जन्म झालेल्या पंडित शिवकुमार शर्मा यांनी पाचव्या वर्षापासूनच वडलांकडून गायकी आणि तबल्याचं शिक्षण घेतलं. १३ व्या वर्षी त्यांनी संतूर शिकायला सुरुवात केली आणि १९५५ मध्ये मुंबईत पहिला कार्यक्रम सादर केला. भारतीय अभिजात संगीताला सातासमुद्रापार मोठी प्रतिष्ठा मिळवून देण्यात पंडित शिवकुमार शर्मा यांनी अतुलनीय योगदान दिलं. शर्मा यांनी संतूर हे काश्मिरी वाद्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय केलं. हिंदी चित्रपटांमधून संतूरच्या सुरावटी त्यांनी लोकप्रिय केल्या. झनक झनक पायल बाजे चित्रपटाला त्यांनी दिलेल्या पार्श्व् संगीतानं अमीट छाप उमटवली. बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीनं त्यांनी सिलसिला, आणि इतर चित्रपटांना संगीत दिलं. त्यांच्या अनेक सांगितिक ध्वनिमुद्रिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आहेत.

शर्मा यांच्या निधनानं कलाजगताची मोठी हानी झाली आहे. शर्मा यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांचं संगीत पिढ्यानपिढ्याना मंत्रमुग्ध करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. चिंतनशील असलेल्या पंडित शिवकुमार शर्मा यांनी आपल्या वादनातून शास्त्रीय संगीतात नवनवे प्रयोग यशस्वी करून दाखवले. एक महान कलाकार, श्रेष्ठ गुरु, संशोधक आणि सहृदय व्यक्ती असलेल्या शिवकुमार शर्मा यांनी अनेक उत्तम शिष्य घडवले आणि संगीत विश्व समृद्ध केलं, असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पंडित शर्मा आणि संतूर वाद्य यांचे अतूट असे नाते आहे. त्यांच्या नावानेच संतूरला ओळख मिळाली. संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा मानबिंदू अस्ताला गेला, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंडित शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत.