राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त आज राज्यातल्या विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व कार्यक्रमाचं उद्घाटन आणि ग्रंथांचं प्रकाशन आज झालं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला संबोधीत केलं. शाहू महाराज ज्या वृत्तीविरोधात लढले त्या विरोधात लढून सामाजिक समता स्थापित करुया, असं मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या विधान भवनात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे यांनी मुंबईतल्या चित्रकूट निवासस्थानी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून १०० सेकंद स्तब्ध उभं राहून अभिवादन केलं.

कोल्हापुरात शाहू समाधी स्थळ इथं विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांनी 100 सेकंद स्तब्ध उभं राहून शाहू महाराजांना अभिवादन केलं.

सोलापूर जिल्ह्यातही छत्रपती शाहू स्मृती शताब्दी समितीच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथं सकाळी शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभं राहून वंदन करण्यात आलं. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं १०० पेक्षा अधिक व्याख्यानं आयोजित केली आहेत.

मुंबईतल्या गिरगांवात खेतवाडी गल्ली क्रमांक १३ मध्ये उभारण्यात आलेल्या ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृतिस्तंभाचं लोकार्पण मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल करण्यात आलं.