ग्राहकांच्या हक्कांचं उल्लंघन केल्याबद्दल ओला आणि उबेर प्रवासी वाहतूक कंपन्यांना नोटीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ग्राहकांच्या हक्कांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि व्यापारसंबंधी गैरमार्गांचा वापर केल्याबद्दल ओला आणि उबेर या दोन प्रवासी वाहतूक कंपन्यांना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नोटीस पाठवली आहे. ग्राहक तक्रार निवारण यंत्रणांचा अभाव, सेवेतल्या त्रुटी, तसंच शुल्कांची आकारणी करताना अव्यवहार्य अल्गोरिदम वापरणं आणि रद्द करण्याचं अवाजवी शुल्क आकारणं यांच्यासह विविध मुद्द्यांच्या आधारे प्राधिकरणानं ही नोटीस पाठवली आहे.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल २०२१ ते १ मे २०२२ या काळात ओला आणि उबेरविरुद्ध २ हजार ४८२ तक्रारी नोंदवण्यात आल्या. या संदर्भात ओला, उबेर, मेरू कॅब्ज, रॅपिडो आणि जुगनू यांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या आठवड्यात बैठक झाल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं म्हटलं आहे.

ग्राहकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी या कंपन्यांन राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनबरोबर भागिदारी करावी, तसंच ग्राहक संरक्षण कायदा २०१९ आणि ई-कॉमर्सविषयक नियमांचं पालन करावं अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.