आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजपासून पंचायत राज उत्सव साजरा केला जाणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंचायत राज मंत्रालयातर्फे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजपासून पंचायत राज उत्सव साजरा केला जात आहे. पंचायतींच्या नवनिर्माणाचा संकल्पोत्सव या नावानं येत्या 17 एप्रिलपर्यंत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांचं स्थानिकीकरण या विषयावर होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेनं या सप्ताहाची सुरुवात होणार आहे. या सप्ताहाअंतर्गत विविध विषयांवर परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत. शाश्वत विकासाची उद्दिष्टं साध्य करण्यात पंचायतींचं महत्त्व विविध कार्यक्रमांद्वारे अधोरेखित करण्यात येणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय पंचायत राज दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारनं काल राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर केले आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारांच्या अंतर्गत 2022 चा सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार, कोल्हापूर जिल्हा परिषदेला जाहीर झाला असून सर्वोत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कारामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या पंचायत समित्यांची निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये राज्यातील 17 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्याचबरोबर बालसुलभ ग्राम पंचायत पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीला आणि ग्राम पंचायत विकास आराखडा पुरस्कार अहमदनगरच्या लोहगाव या ग्राम पंचायतीला मिळाला आहे. नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार 2022 हा राज्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातील भंडारवाडी या ग्रामपंचायतीला मिळाला असल्याची माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल दिली. सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेला 50 लाख रुपये, सर्वोत्कृष्ट पंचायत समित्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि उत्कृष्ट ग्राम पंचायतींना लोकसंख्येप्रमाणे 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात ग्राम पंचायतीच्या खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.