देशाची एकता आणि अखंडतेबरोबर कोणत्याही प्रकारची तडजोड करता येणार नाही - प्रधानमंत्री

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची एकता आणि अखंडतेबरोबर कोणत्याही प्रकारची तडजोड करता येणार नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.ते आज राष्ट्रीय नागरी सेवा दिनाच्या निमित्तानं आयोजित पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. या देशाची बांधणी नवनिर्मिती आणि देश प्रथम या तत्वावर चालणाऱ्यांनी केली आहे असंही ते म्हणाले. देशाच्या एकतेला आणि अखंडतेला मजबुती देईल अशाचं पद्धतीने प्रत्येक निर्णय घेतला पाहिजे तसचं प्रशासकीय सेवेतल्या प्रत्येक अधिकाऱ्यानं हा देश नव्या उंचीवर पोहोचेल यासाठी काम करायला हवं असंही त्यांनी सांगितलं. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी सरकारबरोबर संघर्ष करावा लागू नये, त्यांना त्यांच्या साठीच्या सेवा आणि त्यांचे फायदे सहजगतीनं मिळाले पाहिजेत. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरी अधिकाऱ्याने समाजाचा विकास करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते अंमलबजावणीच्या काही यशस्वी घटनांवर आधारित एका ई पुस्तकाचं प्रकाशनही केलं. यावेळी प्रशासकीय सेवेमधल्या नव्या कल्पना राबवल्याबद्दल ५ प्रमुख कार्यक्रमांतर्गत एकुण १६ पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार जिल्हा, अंमलबजावणी संस्था, केंद्र आणि राज्य सरकारच्या संस्थांनी केलेल्या सामान्य माणसांच्या हिताच्या कार्यक्रम राबवल्या बद्दल दिले गेले.