मद्याऐवजी पेट्रोल डिझेलवरचे कर कमी केले, तर इंधन तेल स्वस्त होईल - हरदिप सिंग पुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपेतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी विदेशी मद्याऐवजी पेट्रोल डिझेलवरचे कर कमी केले, तर इंधन तेल स्वस्त होईल, असं सांगत पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी या राज्यांमधल्या सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे.

भाजपाशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेवरचा मूल्याधारीत कर साडे चौधा ते साडे सतरा रुपये असताना इतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हा कर २६ ते ३२ रुपये प्रति लीटर आहे, असं पुरी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. 

महाराष्ट्र सरकारनं पेट्रोलवर प्रति लीटर ३२ रुपये १५ पैसे, तर राजस्थाननं २९ रुपये १० पैसे कर लादला आहे. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये हाच कर १४ रुपये ५१ पैसे, तर उत्तरप्रदेशात तो साडेसोळा रुपये आहे, असं त्यांनी नमूद केलं आहे.

त्याआधी काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी इंधन दर वाढीवरुन केंद्र सरकारवर टीका केली होती. इंधन दरवाढ आणि कोळसा टंचाईसाठी केंद्र सरकार राज्यांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.