दिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यात वापरल्यास देश अधिक प्रगती करेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

मुंबई : पूर्वी अपंग व्यक्तींमध्ये न्यूनगंडाची भावना असायची. अंगभूत प्रतिभेची जाणीव करून दिल्यामुळे दिव्यांगांमध्ये आज नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. दिव्यांगांची सेवा ही ईशसेवा मानून विविध समाज घटकांनी कार्य केल्यास व दिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यासाठी वापरल्यास देश निश्चितपणे अधिक प्रगती करेल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

दिव्यांग मुले व युवकांच्या ‘दिव्य कला शक्ती : दिव्यांगतेतून क्षमतांचे दर्शन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन बुधवारी (दि. 27) राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नेहरू केंद्र मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे मुंबईच्या अली यावर जंग राष्ट्रीय वाक् व श्रवण दिव्यांगजन संस्थेच्या सहकार्याने  ‘दिव्य कला शक्ती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘दिव्य कला शक्ती’ या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, दमण व दीव येथील दीडशे पेक्षा अधिक दिव्यांग मुले व युवक भाग घेत आहेत.

आज दिव्यांग मुले सामान्य मुलांच्या कुठेही मागे नाहीत. दिव्यांग युवक-युवती मल्ल्लखांब प्रशिक्षण घेत आहेत; युद्धात हात पाय गमावलेले दिव्यांग जवान तोंडाच्या मदतीने सुंदर चित्रे काढताना आपण पाहिले आहेत. दिव्यांग क्रीडापटूंचे पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी पदके प्राप्त करण्यात मोठे योगदान आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

मनुष्याची सेवा हीच खरी ईशसेवा आहे असे सांगून गरिब, वंचित, दिव्यांग व्यक्तींना देव मानून त्यांची सेवा केली तर देश अधिक प्रगती करेल असे राज्यपालांनी सांगितले.

‘दिव्य कला शक्ती’ कार्यक्रमाचे आयोजन करून दिव्यांगांमधील क्षमतांचे समाजाला दर्शन घडविल्याबद्दल राज्यपालांनी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय तसेच अली यावर जंग राष्ट्रीय वाक् व श्रवण विकलांग (दिव्यांगजन) संस्थेचे अभिनंदन केले. दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना देखील त्यांनी कौतुकाची थाप दिली.

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी व्हिडीओ माध्यमातून संबोधित करताना दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व क्षेत्रांमध्ये अधिक समन्यायी व समावेशक वातावरण तयार करण्याचे आवाहन केले.   कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या सचिव अंजली भावरा व सहसचिव राजेश कुमार यादव प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपालांनी यावेळी दिव्यांगजनांशी संवाद साधला, तसेच दिव्यांग मुले व युवकांनी सादर केलेला कला, संगीत, नृत्य व ऍक्रोबॅटिक्सचा कार्यक्रम पाहिला.