हुनर हाट मेळ्याला लाखो लोकांनी दिली भेट- केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात सुरु असलेल्या चाळीसाव्या हुनर हाट मेळ्याला मुंबई आणि परिसरातल्या लाखो लोकांनी भेट दिली असून ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, असं केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. 

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कारागिरांच्या उत्पादनांची “हुनर हाट” मध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानं ते खुश असल्याचं नक्वी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर लोकल आणि “आत्मनिर्भर भारत” या आवाहनाला “हुनर हाट” बळ देत आहे. याशिवाय, देशाच्या दुर्गम भागातल्या पारंपरिक कला आणि हस्तकलांना यामुळे प्रोत्साहन मिळत आहे. “हुनर हाट” ने केवळ ६ वर्षांच्या कमी कालावधीत ९ लाख ५० हजारांहून अधिक कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या लाभार्थ्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक महिला कारागीर आहेत. असं नक्वी म्हणाले.

हुनर हाट”च्या समारोप समारंभाच्या निमित्तानं आज विविध कला, सांस्कृतिक, संगीत आणि लेझर लाइट शो कार्यक्रमांचा एक मेगा इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या प्रथितयश कलाकारांना मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते  सन्मानित केलं जाणार आहे. १६ एप्रिलला सुरु झालेला हा मेळावा उदयापर्यंत सुरु आहे.