भारत इजिप्तला गव्हाची निर्यात करणार - पियुष गोयल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षापासून भारत इजिप्तला गव्हाची निर्यात करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत केली. इजिप्त गव्हाच्या आयातीत जगातल्या सर्वात आघाडीच्या देशांपैकी एक आहे. गोयल यांनी मागच्या महिन्यातल्या आपल्या दुबईच्या दौऱ्यात, इजिप्तचे नियोजन आणि अर्थिक विकास मंत्री डॉ. हला अल सैद यांची भेट घेऊन, इजिप्तची उच्च गुणवत्तेच्या गव्हाचा पुरवठा करायची भारताची तयारी असल्याबाबत चर्चा केली होती.

यानंतर इजिप्तच्या कृषीविषयक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पंजाबमधले विविध प्रक्रियाविषयक प्रकल्प, बंदरं तसंच गव्हाच्या शेतीच्या ठिकाणांना भेट दिली होती. या वर्षभरात इजिप्तमध्ये ३० लाख टन गव्हाचं निर्यात करायचं उद्दिष्ट सरकारनं समोर ठेवलं आहे, अशी माहिती कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. अंगमुथू यांनी दिली.