महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार

 


नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना शनिवारी उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू  यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी  पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने येथील विज्ञान भवनात आयोजित शानदार कार्यक्रमात महाराष्ट्रातील तीन कलाकारांसह देशभरातील  कलाकारांना वर्ष २०१८ चे संगीत नाटक अकादमी  आणि वर्ष २०२१ चे ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिकमंत्री जी .किशन रेड्डी संगीत नाटक अकादमी तथा ललित कला अकादमीच्या अध्यक्ष उमा नंदुरी यावेळी उपस्थित होत्या.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या कार्यक्रमात   महाराष्ट्रातील तीन कलाकारांसह देशभरातील ४० कलाकारांना वर्ष २०१८ चे नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. १ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सुगम संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना यावेळी गौरविण्यात आले. अनेक सुपरहिट गाण्यांमुळे चाहत्यांच्या मनावर गारूड करणारे प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना सुगम संगीतातील योगदानासाठी या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. सुरेश वाडकर यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन केले आहे. यासोबतच त्यांनी भोजपुरी, मल्याळी, कोकणी, गुजराती , बंगाली आणि सिंधी चित्रपटांमधून तसेच उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.

नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाटककार राजीव नाईक यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांना मराठी साहित्यात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्री नाईक यांनी लिहिलेली ‘अनाहत’, ‘वांधा’, ‘अखेरचं पर्व’, ‘साठेंच काय करायचं?’ आदि नाटके प्रसिद्ध आहेत. श्री नाईक यांनी लिहिलेली ‘नाटकातलं मिथक’, ‘खेळ नाटकाचा’, ‘नाटकातला काळ आणि अवकाश’, ‘न नाटकाचा’ आदी पुस्तके नाटकांच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरली आहेत.

नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी  सुहास जोशी यांना गौरविण्यात आले. अनेक नाटक, ‍ चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  मराठी ,हिंदी, इंग्रजी सिनेसृष्टी तसेच नाट्य क्षेत्रात त्यांनी  चरित्र अभिनेत्री म्हणून अनेक भूमिका वठविल्या आहेत.राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून त्यांनी अभिनयाचे  शिक्षण पूर्ण केले असून महाविद्यालयीन दिवसापासूनच त्यांनी अनेक व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

प्रसिद्ध तबलावादक  झाकीर हुसेन यांना  वर्ष २०१८ ची संगीत नाटक अकादमीची फेलोशिफ जाहीर झाली  होती. आजच्या पुरस्कार वितरण समारंभात काही अपरिहार्य कारणास्तव  ते उपस्थित राहून शकले नाहीत.

या कार्यक्रमात वर्धा येथे जन्मलेले  प्रसिद्ध  शास्त्रीय गायक मणी  प्रसाद, मुंबईत जन्मलेल्या अलमेलू मणी  यांना कर्नाटक संगीतातील योगदानासाठी  आणि  मुंबईत जन्मलेले  दीपक मुजुमदार यांना भरतनाट्यम क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image