डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून अभिवादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना अभिवादन केलं जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी संसदभवनाच्या प्रागंणात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मंत्रीमंडळातले अनेक सदस्य, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, काँग्रेसअध्यक्ष सोनिया गांधी, राज्यसभेचे विरोधीपक्षनेते मल्लिकार्जून खरगे आणि संसद सदस्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. समाजातल्या वंचित वर्गाला मुख्य धारेत आणण्यासाठी बाबासाहेबांनी केलेलं काम प्रत्येक पिढीसाठी आदर्श राहील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज देशासाठी बाबासाहेबांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा कटीबद्ध होण्याचा दिवस आहे, असं सागंत प्रधानमंत्र्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. राज्यातही विविध कार्यक्रम होत आहेत. कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणानं साजरी केली जात होती. मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध हटवल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहानं साजरी केली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी सामुदायिक त्रिशरण आणि बुद्ध वंदना करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर इथं चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसंच चैत्यभूमीवरच्या भिमज्योतीला पुष्प अर्पण करण्यात आलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे, आणि इतर मान्यवरांनीही अभिवादन केलं. मुंबई महापालिकेनं भरवलेल्या, बाबासाहेबांविषयीच्या मराठी आणि इंग्रजी कॉफी टेबल बुक प्रदर्शन आणि बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शन दालनालाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आलं. विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुंबईत ठिकठिकाणी जयंती उत्सवाचं आयोजन केल असून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. संध्याकाळी विभागवार बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत.