सचिवालयाने सरकारी अधिकारी आणि महत्त्वाच्या क्षेत्रातील संघटनांमधील अधिकाऱ्यांसाठी एनसीएक्स इंडिया अर्थात राष्ट्रीय सायबर सुरक्षेशी संबंधित घटनांच्या प्रतिसादाच्या सराव कार्यक्रमाचे केले आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल के सी यांनी आज राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक लेफ्टनंट जनरल राजेश पंत आणि डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे सचिव सतीश रेड्डी यांच्यासह एनसीएक्स इंडिया अर्थात राष्ट्रीय सायबर सुरक्षेशी संबंधित घटनांच्या प्रतिसादाच्या सराव कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सध्या अधिकाधिक प्रमाणात समोर येत असलेल्या  सायबर धोक्यांबद्दल माहिती देऊन सायबर सुरक्षेशी संबंधित घटनांची हाताळणी तसेच प्रतिसाद याविषयी सरकारच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत संघटनांमधील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने 18 ते 29 एप्रिल 2022 या कालावधीत राष्ट्रीय सायबर सुरक्षेशी संबंधित घटनांच्या प्रतिसादाच्या सराव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयातर्फे घेण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाच्या आयोजनात  डीएससीआय अर्थात भारतीय माहिती सुरक्षा मंडळ माहितीविषयक भागीदार म्हणून सहभागी झाले असून, डीआरडीओचा पाठींबा या कार्यक्रमाला लाभलेला आहे. जागतिक पातळीवर अनेक मोठे सायबर सुरक्षा संबंधी कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सायबरएक्सर टेक्नॉलॉजिज या इस्टोनियन सायबर सुरक्षा कंपनीकडून या कार्यक्रमासाठी आवश्यक प्रशिक्षण मंच पुरविण्यात आला आहे.

प्रशिक्षण सत्रे, थेट हल्ला आणि धोरणात्मक सराव यांच्या माध्यमातून या कार्यक्रमात 140 हून अधिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. इंट्रुजन डिटेक्शन तंत्र, धोकादायक संगणकीय प्रणालींची माहिती सामायिक करणारा मंच, असुरक्षित बाबींची हाताळणी आणि हल्ल्याच्या तीव्रतेचे परीक्षण, नेटवर्क नियमावली, माहितीचा ओघ, डिजिटल न्यायवैद्यक सारख्या सायबर सुरक्षेला असलेल्या धोक्यांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांबाबत सहभागींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण व्यक्तींना सायबर धोके अधिक उत्तम प्रकारे समजून घेणे, त्याविषयीच्या सज्जतेचा अंदाज घेणे आणि सायबर संकटांचे व्यवस्थापन आणि सहकार्य यासाठीची कौशल्ये विकसित करणे यासाठी  एनसीएक्स इंडिया सरावाची मोठी मदत होईल. आपली सायबर सुरक्षा विषयक कौशल्ये, संघभावना,नियोजन, संपर्क, महत्त्वपूर्ण विचारपद्धती आणि निर्णय क्षमता यांचा विकास करून त्यांच्या क्षमतेची  चाचणी घेण्यासाठी देखील हे प्रशिक्षण मदत करेल.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल ए सी यांनी त्यांच्या बीजभाषणामध्ये देशात होत असलेल्या डिजिटल क्रांतीवर आणि केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात येत असलेल्या अनेक डिजिटल सोयीसुविधांवर भर दिला. सायबर सुरक्षा हा कोणत्याही डिजिटल परिवर्तनाचा पाया असतो असे ते पुढे म्हणाले. सायबर अवकाशाला निर्माण झालेला कोणताही धोका आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेवर थेट परिणाम करत असतो आणि म्हणून आपल्याला आपल्या सायबर अवकाशाचे योग्य रीतीने संरक्षण करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.