सोलापुरात राष्ट्रीय महामार्गांचं नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय रस्ते विकास आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोलापुरात ८ हजार १८१ कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण आणि भूमीपूजन झालं. गडकरी यांच्या हस्ते सोलापूर- विजयपूर, सोलापूर- सांगली आणि सोलापूर अक्कलकोट असे 3 राष्ट्रीय महामार्ग यावेळी राष्ट्राला समर्पित करण्यात आले. अंदाजे ८ हजार १७ कोटी रुपये खर्चातून अडीचशे किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार केले आहेत. तर १६४ कोटी रुपयांच्या ४२ किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन देखील गडकरी यांच्या हस्ते झालं.

या कार्यक्रमाला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर गडकरी यांनी सोलापुरातल्या प्रिसिजन ग्रुपने तयार केलेल्या इलेक्ट्रिक बसची पाहणी केली, तसंच या बसमधून प्रवास केला आणि बस बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली.

काल रात्री त्यांनी सोलापूर इथं वस्त्रोद्योग कारखानदारांशी संवाद साधला. वस्त्रोद्योगाच्या विकासाकरता निर्मिती मूल्य कमी करून उत्पादनाची गुणवत्ता कायम राखणं गरजेचं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. कापड उद्योगासाठी आवश्यक कच्च्या माल आणि त्यापासून कापड निर्मिती सोलापूरमधेच करावी. यामुळे जिह्यात रोजगार निर्मिती तर होईलच, सोबतच गणवेश उत्पादन खर्च कमी होऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहता येईल, असं गडकरी म्हणाले. सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननं गणवेश निर्मिती उद्योगाला चालना मिळावी यासाठी हैदराबादमध्ये पाचवं आंतरराष्ट्रीय गणवेश प्रदर्शन आयोजित केलं आहे. या प्रदर्शनाचा टीझर गडकरी यांनी प्रदर्शित केला.