भविष्यात अपारंपरिक पद्धतीने युद्ध होण्याची शक्यता - संरक्षण मंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमेवरून सैन्य मागे घेणं आणि त्या भागातला तणाव कमी करणं हाच देशाच्या उत्तर सीमेबाबतच्या समस्येवर पुढे जाण्याचा मार्ग आहे, असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल आयोजित करण्यात आलेल्या लष्करी कमांडर्स परिषदेत ते बोलत होते.

उत्तर सीमेवर आपलं सैन्य ठामपणे उभं असून, या समस्येवर शांततापूर्ण समाधानासाठी सुरु असलेली चर्चा चालूच राहील असा विश्वास सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. अपारंपरिक आणि संमिश्र युद्धनीती हाच भविष्यातील युद्धतंत्राचा भाग असेल असं सिंह पुढे म्हणाले. देशाच्या पश्चिम सीमेबाबत बोलताना संरक्षणमंत्र्यांनी लष्कराने सीमेपलीकडील दहशतवादाला दिलेल्या प्रत्युत्तराचं कौतुक केलं, तथापि इथेही छुपं युद्ध सुरूच असल्याचं त्यांनी नमूद केलं.