मुंबईतल्या ९९ पूर्णांक ९३ शतांश टक्के कर्मचाऱ्यांमध्ये आढळले प्रतिपिंड

 


मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या संख्यात्मक दृष्ट्या प्रतिपिंड पातळी मोजणाऱ्या पहिल्या सेरो सर्व्हेक्षणात ९९ पूर्णांक ९३ शतांश टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंड आढळले आहेत. कोविड-१९ विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरच्या कर्मचाऱ्यांमध्ये हे अशा प्रकारचं पहिलं आणि एकुणात सहावं सेरो सर्व्हेक्षण अर्थात रक्त नमुन्यां ची चाचणी करुन प्रतिपिंड शोधण्याबाबतचं सर्व्हेक्षण होतं. एकूण ३ हजार ९९ पैकी ३ हजार ९७ कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंड आढळले. विशेष म्हणजे, लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत वर्धक मात्रा डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडांची पातळी अधिक आढळली आहे. सहा महिन्यांनी याच व्यक्तींचे प्रतिपिंड पातळी मोजणारे दुसरे सर्व्हेक्षण होणार आहे. अश्या स्वरूपाचे भारतातील हे कदाचित पहिलेच सर्व्हेक्षण आहे. लसीकरणाचा प्रभाव किती काळ आणि कसा टिकतो, याचा अभ्यास याद्वारे होत असल्यानं ते एकूणच लसीकरणाबाबत दिशादर्शक ठरणार आहे.