महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशाची आदरांजली

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इत्यादी मान्यवरांनी आज ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली.  वंचिताच्या आणि महिलांच्या उन्नतीसाठी ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कार्यामुळे सामावेशक समाज उभारण्याच्या आपल्या प्रयत्नांना कायम प्रेरणा मिळत राहिली आहे, असं नायडू यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि असंख्य लोकांसाठी आशेचा स्रोत म्हणून महात्मा फुले यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. महात्मा फुले हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. सामाजिक समानता, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी अथक कार्य केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल देश सदैव त्यांचा ऋणी राहील, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांच्या कार्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण त्यांना करुन अभिवादन केलं आहे. महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार पुढं घेऊन जाण्यासाठी राज्यातल्या जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.