देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं - एम.व्यंकय्या नायडू

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं  सशक्तीकरण महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ‘शाश्वत विकासाची उद्दिष्ट, स्थानिक पातळीवर’ या विषयावर पंचायत राज मंत्रालयानं नवी दिल्ली इथं  राष्ट्रीय स्तरावरच्या लाभार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या  संमेलनाला संबोधित करताना ते आज बोलत होते. शाश्वत विकासाची उद्दिष्ट राष्ट्रीय स्तरावर पूर्ण करण्यासाठी गावांचा विकास व्हायला हवा, आणि यासाठी दळणवळण, पायाभूत सुविधा आणि जलसिंचन महत्वाचं असल्याचं ते यावेळी म्हणाले. डिजिटल शासनाच्या अभियानाची पूर्तता होण्यासाठी देशातल्या ग्रामपंचायतींना एकाच व्यासपीठावर  एकत्र आणण्याची गरज असून  वर्षातून एकदा ग्रामसभा आयोजित करायला हव्यात तसंच या सभा यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचं ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या मदतीनं काम करताना जास्तीतजास्त पारदर्शकता राहावी यासाठी पंचायत राज  व्यवस्थेकडे  कृती आराखडा असायला हवा असं पंचायत राज मंत्री गिरीराज सिंग यावेळी म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंचायत राज मंत्रालय आजपासून  जन -उत्सव आठवडा  साजरा करत आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्ट ग्रामीण स्तरावर  ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गाठता यावीत, यासाठी या अभियानातल्या  सर्व भागीदारांना प्रोत्साहन देणं, हा यामागचा उद्देश आहे.