भारत आणि आस्‍ट्रेलिया या देशांच्या परस्पर संबंधांमधे उल्लेखनीय प्रगती - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या परस्पर संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या शिखर परिषदेत बोलत होते. बंगळुरू इथं Centre of Excellence for Critical and Emerging Technology Policy स्थापन करण्याच्या घोषणेचं त्यांनी यावेळी स्वागत केलं. दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये चांगलं सहकार्य असून जल व्यवस्थापन, शाश्वत ऊर्जा, खनिज क्षेत्रासह विविध क्षेत्रातलं सहकार्य देखील वेगानं वाढत असल्याचं त्यांनी  सांगितलं.

ऑस्ट्रेलियानं भारताला प्राचीन कलाकृती परत केल्याबद्दल त्यांनी आभार यावेळी आभार व्यक्त केले. आस्‍ट्रेलियानं भारताला २९ प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं या कलाकृतींचं निरीक्षण केलं. या कलाकृतींची सहा श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. यात शिव आणि त्याचे भक्त, शक्तीची आराधना करणारे भक्त, भगवान विष्णू आणि त्याची वेगवेगळी रूपं, जैन मूर्ती आणि सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे. विविध प्रकारचे दगड, कागद, धातू अशा साहित्यापासून बनलेल्या या प्राचीन कलाकृती नवव्या आणि दहाव्या शतकातल्या असून त्यांचं मूळ  राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या प्रदेशांमधलं आहे.