ऑपरेशन गंगामधल्या संबंधितांशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधे अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्याच्या ऑपरेशन गंगा मधे सहभागी झालेल्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. या अभियानाद्वारे सुमारे २३ हजार भारतीय मायदेशी परतले, तर इतर १८ देशातल्या मिळून १४७ नागरिकांनीही याचा लाभ घेतला. यातल्या प्रातिनिधिक अनुभवांचं कथन यावेळी सहभागींनी केलं. त्यांच्यावरचं संकट आणि त्यातून बाहेर पडायला ऑपरेशन गंगाची मदत याबद्दलचे अनुभव त्यांनी सांगितले, तसंच कृतज्ञता व्यक्त केली.

या मोहिमेसाठी निरलस कष्ट घेणाऱ्या व्यक्ती, संस्था, सरकारी यंत्रणा, खाजगी कंपन्या इत्यादींचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं. विशेषतः तिथल्या भारतीय समुदायाच्या स्वयंसेवी संस्था संघटनांनी दाखवलेल्या देशभक्ती आणि माणुसकीमुळं भारतीय मूल्यांचा जगात उचित गौरव झाला असल्याचं मोदी म्हणाले. ऑपरेशन गंगाकरता मदत केल्याबद्दल युक्रेन आणि शेजारी राष्ट्रांचेही प्रधानमंत्र्यांनी आभार मानले.